हवामान अंदाज : १५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२१

किसानवाणी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होत असल्याचे पहायला मिळत आहे. अवकाळी पावसाची ही परिस्थिती महाराष्ट्रात आणखी काही दिवस अशीच राहणार असून महाराष्ट्राच्या विविध भागात मेघगर्जना, विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

आजपासून (१५ एप्रिल) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर कमी होणार असला तरी काही अंशी ढगाळ वातावरण राहणार आहे. तर विदर्भातील बहुतांशी भागात सोमवारपर्यंत (ता. १९) मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मागील काही दिवसांपासून हिमालय, पश्‍चिम बंगाल, सिक्किम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओडिशाचा परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर असून पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकाची किनारपट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राचा प्रभाव कमी होऊ लागला असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत वातावरण काही प्रमाणात कोरडे होत आहे. तर उत्तर कर्नाटक परिसर आणि कोमोरीन परिसर व मध्य प्रदेशच्या वायव्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या दिशेने खेचले जाण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भात आणखी तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. 
सविस्तर हवामान वृत्तांत पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

विदर्भाच्या या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता :
गुरूवार (१५ एप्रिल) : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ. 
शुक्रवार (१६ एप्रिल) : अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ. 
शनिवार (१७ एप्रिल) : अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ. 
रविवार (१८ एप्रिल) : अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ.