Saturday, January 28, 2023
HomeWeather१९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान राज्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता; १९...

१९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान राज्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता; १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट

किसानवाणी : वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत असून येत्या चार – पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार सुरू आहेत. किमान तापमानाचा पारा वाढल्याने राज्यातून थंडी देखील गायब झाली आहे. १९ ते २५ नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैऋत्य मोसमी वारे देशातून परतून जवळपास एक महिना उलटून गेला आहे. तरीही यावर्षी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाळा संपून उत्तरेकडील थंडीची लाट सुरू होते. पण यावर्षीचा हिवाळा मात्र याला अपवाद ठरला आहे.

११ ते १७ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पुणे, सांगलीत सरासरी इतका पाऊस झाला. तर नगर यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आणि कोरडे हवामान होते. 


बंगालच्या उपसागर, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तर महाराष्ट्राच्या विविध भागांत पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १९ ते २५ नोव्हेंबर या आठवडाभरामध्ये संपूर्ण राज्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.  

हवामान खात्यानं मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 19 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमानातही चढ-उतार होतच आहे. १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांनी अधिक, कोकणात ० ते २ अंशांनी अधिक तर उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments