Homeबातमी शेतीचीहवामान अंदाज : यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस; मान्सून शुक्रवारी दाखल होण्याचे...

हवामान अंदाज : यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस; मान्सून शुक्रवारी दाखल होण्याचे संकेत

किसानवाणी : दरवर्षीप्रमाणे सर्वांना उत्सुकता लागून असलेला मान्सून येत्या शुक्रवारी अंदमानात दाखल होण्याचे संकेत आहेत. गुजरातमध्ये ‘तौत्के’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच नैऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे. शुक्रवार २१ मे पर्यंत मॉन्सून अंदमान बेटांवर दाखल होण्याची आशा आहे. तर रविवार २३ मे पर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

यंदा मॉन्सून नियमित वेळेआधी म्हणजेच एक जूनपूर्वी केरळात दाखल होईल. ३१ मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच यंदाच्या मॉन्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यान ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पूर्वानुमान देखील व्यक्त करण्यात आले आहे. 

गुजरातमध्ये मंगळवारी दाखल झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागताच दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. या भागात विषुववृत्ताकडून वाऱ्यांचे प्रवाह येण्यास सुरुवात असून, ढगांची रेलचेल पहायला मिळत आहे. अंदमान निकोबार बेटांवर साधारणतः १८ ते २० मेपर्यंत मॉन्सून दाखल होत असतो. मात्र यंदा चक्रीवादळामुळे उशिरा मॉन्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे. रविवारी २३ मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्याकडे जाताना ही प्रणाली अधिक तीव्र होणार असून, मॉन्सूनचा प्रवाह आणखी बळकट होण्यास मदत मिळणार आहे.

‘तौत्के’ अतितीव्र चक्रीवादळ सोमवारी १७ मे रोजी रात्री गुजरातच्या किनारपट्टीला धडकून, जमिनीवर आले. हे वादळ गुजरातमध्ये घोंघावत असून, त्याची तीव्रता ओसरू लागली आहे. ही वादळी प्रणाली राजस्थानकडे सरकत जात आहे. त्यामुळे गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आता या वादळाचा प्रभाव आणखी कमी होऊन वाऱ्याचा वेग मंदावणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments