हवामान अंदाज : मुसळधार पावसाची शक्यता; घराबाहेर पडताना काळजी घ्या

किसानवाणी : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर पहायला मिळणार आहे. पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.

काल सायंकाळी पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. वेगवान वारे आणि हवेचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका असण्याची शक्यता होती. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं होत. हीच परिस्थिती आज (२४ नोव्हेंबर) सकाळपासून ठिकठिकाणी पहायला मिळत असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा , विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. तर राज्यातील काही भागात चांगलाच जोरदार पाऊस झाला. आता राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. राज्यात पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.