५ जुलै २०२० हवामान अंदाजः ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस

किसानवाणी :
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जून महिन्यात सक्रिय झालेल्या मान्सूनने जूनच्या उत्तरार्धात मात्र विश्रांती घेतल्याचे दिसत होते. विश्रांतीनंतर आता जुलैच्या सुरवातीपासूनच पावसाला चांगली सुरवात झाली आहे. 

कोकणात शुक्रवार (३ जून) पासून पावसाला सुरवात झाली आहे. घाटमाथ्यावर देखील जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात हवामान विभागाने रेडअलर्ट व ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे आपत्ती निवारण विभाग आणि नियंत्रण कक्षांना मनुष्यबळ आणि साधनसाम्रगीसह सुसज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या घाटमाथ्यावरील शेतकरी खरीपाच्या कामात गुंतला असून भातलागणीची धांदल सुरू आहे. तर इतर ठिकाणी भात, सोयाबीन, भुईमुग याची पेरणी झाली असून काही ठिकाणी पेरणीची कामेही सुरू आहेत.