हवामान अंदाज : ८ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१

किसानवाणी :
राज्याच्या विविध भागात मागील तीन – चार दिवसांपासून ठिकठिकाणी हलका, मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह, द्राक्ष, डाळिंब, आंबा, ऊस, आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात ढगाळ वातावरणाची स्थिती असून नाशिक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या सोमवारपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्र ते मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात ढगाळ हवामान आहे. तसेच दक्षिण गुजरातची किनारपट्टी, पुर्व राजस्थान आणि सौराष्ट्र कच्छ या भागातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा पट्टा पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सक्रिय झाला असून यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.

  • ७ जानेवारी ते १३ जानेवारी चा राज्याचा हवामान अंदाज पाहण्यासाठी Weather Forecast या शब्दांवर क्लिक करा.
  • आज चक्रीवादळ कुठे आहे पाहण्यासाठी Live Cyclone या शब्दांवर क्लिक करा.

हा आहे ८ जानेवारीपासूनचा हवामान अंदाज – 
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात ८ जानेवारी रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांचा कडकटाट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. ९ आणि १० जानेवारी रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

मुंबई आणि आसपासच्या परिसरात ८ आणि ९ जानेवारी रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात ८ आणि ९ जानेवारी रोजी आकाश मुख्यतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. १० जानेवारी रोजी दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार आहे. त्याचबरोबर ११ जानेवारी रोजी आकाश अंशतः ढगाळ राहील. तर १२ आणि १३ जानेवारी रोजी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. 

या जिल्ह्यांमध्ये पावसाची अधिक शक्यता
शुक्रवार (८ जानेवारी) – ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ. 
शनिवार (९ जानेवारी)- ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड. 
रविवार (१० जानेवारी)- पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा. 
सोमवार (११ जानेवारी) – पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा.