हवामान अंदाज : २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२०

किसानवाणी :
यंदा एका मागोमाग एक चक्रीवादळ येत असल्याने सातत्याने पावसाळी हवामानाचे चित्र आहे. नुकतेच आलेले ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच दक्षिण भारताच्या पूर्व भागात पुन्हा कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे. श्रीलंकेच्या जवळील हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून ते भारताकडे सरकत असताना त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यात पुढील आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावरही होणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. 

गेल्या काही दिवसांचा विचार करता, फक्त नोव्हेंबर महिन्यातच ‘गती’ आणि ‘निवार’ अशी दोन चक्रीवादळे तयार झाली. त्यात पुन्हा तिसऱ्या चक्रीवादळाची भर पडत असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. ‘निवार’ चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून जमिनीवर येताच त्याची तिव्रता कमी झाली. मात्र, या चक्रीवादळाचा फटका दोन्ही राज्यांना बसला. तर महाराष्ट्रातही त्याचा काही प्रमाणात परिणाम दिसून आला. महाराष्ट्रातील अनेक भागात यामुळे अंशतः ढगाळ वातावरण पहायला मिळाले. तसेच थंडीतही चढउतार झाला. हीच परिस्थिती नव्याने येत असलेल्या चक्रीवादळामुळे निर्माण झाली असून हवामान बदल दिसू लागले आहेत.  

सध्या आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर विषुवृत्ताजवळील हिंद महासागर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उद्या (रविवारी) या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याची तीव्रता वाढत जाऊन ते २ डिसेंबरच्या दरम्यान तमिळनाडू व पुद्दुचेरीच्या किनारपट्टी जवळ धडकण्याची शक्यता आहे. 

ही वादळे निवळून अरबी समुद्राच्यादिशेने जात नाहीत, तोच बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात सतत निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून यामुळे पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाची स्थिती तयार होणार असून थंडीत चढउतार राहणार आहेत.