Homeबातमी शेतीची'या' आठवड्यात काय राहतील सोयाबीनचे दर? पहा मागणी आणि पुरवठ्याच्या अंदाजावरून अपेक्षित...

‘या’ आठवड्यात काय राहतील सोयाबीनचे दर? पहा मागणी आणि पुरवठ्याच्या अंदाजावरून अपेक्षित दर

किसानवाणी : देशभरातील बाजारात चालू आठवड्यात सोयाबीनची दैनंदिन आवक सरासरी ९ लाख क्विंटलच्या दरम्यान राहिली. तर प्रतिक्विंटल दर ४५०० ते ५१५० रूपयांच्या दरम्यान होते. येत्या काळात बाजारात सोयाबीनची आवक वाढणार असून व्यापारी, सट्टेबाज, प्रक्रिया उद्योजक, आणि स्टॉकिस्ट उतरत असल्याने मागणीही वाढणार आहे. मागणी वाढली तरी त्या प्रमाणात आवकही वाढणार असल्याने दर आहे त्याच पातळीवर स्थिर राहतील असे जाणकारांचे मत आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने सोयाबीन भिजल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे सोयाबीन मधील आर्द्रता वाढली होती. परंतु ही स्थिती आता बदलली असून सोयाबीन मधील आर्द्रता कमी झाली आहे. सध्या ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा असून मागील वर्षीच्या तुलनेत आवक मात्र खूपच कमी आहे. सोयाबीनचा हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरू झाला असला तरी हंगामाच्या तोंडावरच चुकीचे सरकारी धोरण आणि बाजाराची दिशा स्पष्ट न झाल्याने दरात मोठी घसरण झाली. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणण्याचे टाळून दर वाढण्याच्या अपेक्षेने माल शिल्लक ठेवला. 

मागील आठवड्यात स्टॉकिस्ट कडून मालाची मागणी सुरु झाल्याने दर काहीसे सुधारल्याचे पहायला मिळाले. रिफाईंड सोयातेल आणि सोयापेंडीचे दर वरच्याच पातळीवर असून मागणी साधारणच असल्याचे पहायला मिळाले. आंतराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांचे दर काहीसे उतरले असले तरी देशांतर्गत बाजारात मात्र दर फारसे उतरल्याचे दिसत नाही. सणासुदीच्या काळात ग्राहकांना खाद्यतेल कमी दरात मिळावे या हेतूने सरकारने अनेक धोरणे राबवली. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातच खाद्यतेलांचे दर अधिक असल्याने त्याचा फारसा परिणाम देशांतर्गत बाजारात झाला नाही. त्यामुळे सरकारच्या धोरणांवर अविश्वास दाखवत स्टॉकिस्ट आणि व्यापारी मोठी खरेदी करण्यास धजावत नव्हते. 

मागील सप्ताहात देशातील बाजारात सोयाबीनची दैनंदिन आवक सरासरी ९ लाख क्विंटल होती. यामध्ये मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील सरासरी आवक प्रत्येकी ३ लाख टनाच्या आसपास होती. बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे दर आधीच्या तुलनेत या हप्त्यात ५० ते १०० रूपयांनी सुधारून ते ४५०० ते ५१५० रूपये प्रतिक्विंटलच्या आसपास राहिले. प्लांट डिलिव्हरीचे दर ५० ते १५० रूपयांनी सुधारून ते ५१५० ते ५९०० रूपयांवर पोहचले. मध्यप्रदेशातील दर ५१०० ते ५३५० रूपये, महाराष्ट्रातील दर ५२०० ते ५४७५ रूपये,  तर राजस्थानातील प्लांटस् चे दर ५४०० ते ५९०० रूपयांच्या आसपास होते. 

या सप्ताहात रिफांईड सोयाबीन तेलाचे दर दहा किलोमागे १५ ते ३० रूपयांनी सुधारले. त्यामुळे तेलाचे भाव मध्यप्रदेशशात प्रतिदहा किलो १२८५ ते १३१० रूपये , गुजरातमध्ये १२७० ते १२८०, राजस्थानात १३०० ते १३०५, आणि महाराष्ट्रात १२९५ ते १३५० रूपयांवर पोहचले. सोयापेंडेला देशातर्गत बाजारात आणि निर्यातीसाठी मागणी सामान्यच होती. सरकारच्या निर्णयाच्या परिणामामुळे याही सप्ताहात दरात प्रतिटन ५०० ते १००० रूपयांपर्यंत घट झाली. चालू सप्ताहात सोयापेंडीचे दर सरासरी ३८ हजार ७०० ते ४२ हजार रूपयांवर राहिल्याचे दिसून आले. 

येत्या काळात बाजारात सोयाबीनची आवक वाढणार असली तरी त्याप्रमाणात मागणीही वाढणार आहे. त्यामुळे दर आहे त्याच पातळीवर स्थिर राहतील असे जाणकारांचे मत आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments