‘या’ कारणांमुळे सोयाबीनचे दर वाढणार? शेतकऱ्यांनो पॅनिक सेलिंग टाळा

किसानवाणी : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर बाजारपेठांमध्ये स्थिरावल्याचे पहायला मिळत आहे. बाजारात सोयाबीनच्या आवके सोबत मागणीही वाढल्याने दर स्थिर आहेत. एफएक्यू सोयाबीनची सध्या ५००० रूपयांच्या दरम्यान विक्री होत आहे. ही स्थिती पुढील महिना ते दीड महिना टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळून टप्प्या टप्याने विक्री करावी असे आवाहन जाणकारांनी केलं आहे.

बाजारात सोयाबीन मागणी वाढत आहे, त्याचबरोबर आवकही वाढत असल्याने मागील ४-५ दिवसांपासून दर स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे. आवकेचा हंगाम सुरू झाल्यानंतर दर कमी होत गेले होते. परंतु एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला ४८०० ते ५१५० रूपये दर मिळतोय. तर दुय्यम दर्जाच्या सोयाबीनला ३५०० ते ४५०० रूपये दर मिळतोय. 

हेही वाचा – महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव – 30/10/2021

शेतमाल अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितले आहे की, गेल्या हंगामात स्टॉकिस्टना मोठा लाभ झाला. त्यामुळे यंदाही सोयाबीनचे मार्केट वाढेल या अपेक्षेने खरेदीत उतरले आहेत. त्यातच एफपीसी आणि स्टॉकिस्ट यांची खरेदी वाढल्याने बाजार समितीत आवक कमी दिसत आहे. तसेच मोठे शेतकरी भविष्यात दर वाढतील या अपेक्षेने माल राखून ठेवत आहेत.

गरज असलेले शेतकरी माल विकत आहेत. आयात केलेले सोयापेंड महिना दिड महिन्यात संपेल, तेव्हा सोयाबीनचे दर ५० रूपयांच्या फरकाने कमी जास्त होऊन वाढतील. त्यामुळे एफएक्यू सोयाबीनचा बाजार ५ ते साडेपाच हजार रूपयांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदम माल न विकता किमानतीन टप्प्यात मार्चपर्यंत माल विकावा. असे आवाहनही राजेंद्र जाधव यांनी केलं आहे.

सरकारने १२ लाख टन जीएम सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर ७ ते साडेसात लाख सोयापेंडीचे करार झाले होते. ही पेंड पुढील महिना ते दीड महिन्यात संपण्याची शक्यता असून त्यानंतर सोयापेडींसाठी स्थानिक बाजारातून मागणी केली जाईल. त्यामुळे देशातर्गत बाजारपेठेत सोयाबीनच्या दराला आधार मिळून दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुऴे शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्याने सोयाबीन विकून तेजी मंदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जाणकारांनी केलं आहे. 

सध्या बाजारात आवके बरोबर मागणीही वाढलीय. गेल्या हंगामात तुटवड्यामुळे स्टॉक नव्हता, त्यातच दर सध्या ५ हजारांच्या दरम्यान आलेत. सध्याची परिस्थिती पाहता येत्या काळात दर घसरण्याची शक्यता कमी असल्याने प्रक्रिया उद्योजक आणि स्टॉकिस्ट खरेदीत उतरले आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातूनही पुरवठा होताना दिसत आहे. सोयाबीनची आवक वाढल्याने उद्योगाच्या अपेक्षेप्रमाणे दर मात्र कमी झालेले नाहीत. त्यामुळे याच दरात खरेदी वाढली आहे.