शेतजमीन मोजणीसाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

किसानवाणी :
शेतकरी वर्गासमोर अनेकदा त्यांची शेतजमीन नेमकी किती हा प्रश्न पडतो. कारण सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत नसल्याने त्यांच्यासमोर हा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी शेजारच्या शेतकऱ्याने आपल्या शेतजमीनीत अतिक्रमण केल्याचीही शंका निर्माण होते. त्यामुळे ही शंका वेळीच दूर करणे फायद्याचे ठरते. त्यासाठी शासकीय पध्दतीने शेतजमीनीची मोजणी करून घेणे हा पर्याय चांगला ठरतो. परंतु हा अर्ज कुठे आणि कसा करायचा याविषयी फारसी माहिती अनेक शेतकऱ्यांना नसते. त्यामुळे याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आजचा हा लेख…

शेतजमीनीच्या मोजणीसाठी लागणारा अर्ज आणि कागदपत्रे – 

  • शेतकऱ्यांना शेतजमीनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाल्यास, भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात. आणि शेतजमिनीच्या मोजणीसाठी मागणी करू शकतात.
  • जमीन मोजणीसाठी लागणाऱ्या अर्जाचा नमुना https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/1035/Home या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अशी आहे अर्ज भरण्याची पध्दत – 

  • भूमी अभिलेख कार्यालयातून‘मोजणीसाठी अर्ज’ अशा नावाने मिळणारा अर्ज घेतल्यानंतर तो तालुक्यातील कार्यालयात सादर करावा लागतो. यामध्ये पहिल्यांदा तालुका आणि जिल्ह्याचे नाव लिहावे.
  • यानंतर पहिल्या पर्यायापुढे ‘अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता’ याविषयी माहिती भरावी. यात अर्जदाराचे नाव, गाव, तालुका आणि जिल्हा ही माहिती भरावी.
  • अर्जात ‘मोजणी करण्यासंबंधी माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील’ हा दुसरा पर्याय असून यामध्ये मोजणीचा कालावधी आणि उद्देश लिहिणे आवश्यक आहे. यामध्ये सुध्दा तालुक्याचे नाव, गावाचे नाव आणि शेतजमीनीचा गट क्रमांक इत्यादी तपशील भरावा लागतो.

जमीन मोजणीमध्ये ३ प्रकार पडतात. यामध्ये साधी मोजणी (६ महिने कालावधी), तातडीची मोजणी (३ महिने कालावधी), आणि अतितातडीची मोजणी (२ महिने कालाधीच्या आत) याचा समावेश आहे. तसेच मोजणी कालावधीनुसार एक हेक्टर क्षेत्रासाठी साधारणपणे पुढील प्रमाणे रक्कम आकारली जाते. साधी मोजणी (१ हजार), तातडीची मोजणी (२ हजार रूपये) आणि अतितातडीची मोजणी (३ हजार रूपये) असा दर आहे. यानुसार शेतकरी किती कालावधीत नोंदणी हवी ते ‘कालावधी’ कॉलम मध्ये लिहू शकतात. तर ‘उद्देश’ या कॉलममध्ये शेतकऱ्याला मोजणी कोणत्या कारणासाठी करून घ्यायची आहे हे लिहावे लागते. यामध्ये शेतजमिनीची हद्द जाणून घेणे, अतिक्रमण झाले का पाहणे यासारखे उद्देश लिहिता येतात.

  • तिसरा पर्याय ‘सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फी.’ यामध्ये मोजणीची फीची रक्कम आणि त्यासाठी चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहावा. (किती क्षेत्राची मोजणी आणि किती कालावधीत ही मोजणी करायची आहे त्यानुसार ही फी ठरते)
  • यानंतर चौथा पर्याय ‘सातबारा उताराप्रमाणे जमिनीचे सहधारक’ म्हणजेच ज्या गट क्रमांकाची मोजणी करायची आहे, त्याच्या सातबारामधील इतर कुणाची नावे असल्यास त्याचा तपशील आणि या सर्वांची संमती असल्याच्या सह्या आवश्यक असतात.
  • पाचव्या पर्यायात ‘लगतचे कब्जेदार यांची नावे व पत्ता’ लिहिणे गरजेचे आहे. यात शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर दिशांना ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांची नावे लिहावी लागतात.
  • सहाव्या पर्यायात ‘अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे वर्णन’ लिहावे लागते. यामध्ये मोजणी अर्ज, मोजणी फी चलन/पावती, ३ महिन्याच्या आतील सातबारा याचा तपशील. ही सर्व माहिती भरल्यानंतर सदर अर्ज कार्यालयात जमा करावा.

अर्ज जमा केल्यानंतर तो ई मोजणी प्रणालीत फीड करून घेतला जातो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी लागणाऱ्या फीची रक्कम शेतकऱ्यास सांगितली जाते. त्यानुसार त्याचे चलन बनवून दिले जाते. हे चलन घेऊन शेतकऱ्यास बॅंकेत चलनाची रक्कम भरावी लागते. त्याची पावती दिल्यानंतर मोजणीचा रजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तयार होतो. त्यानुसार मग शेतकऱ्याला सदर अर्जाची पोहोच दिली जाते. तसेच यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक असा तपशील दिला जातो.