चिंता वाढली, ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यु ‘बर्ड फ्लू’नेच!

किसानवाणी :
देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढला असताना महाराष्ट्रातही या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले आहे. परभणी जिल्ह्यात ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. परंतु या कोंबड्यांचा मृत्यु कशामुळे झाला याचा अहवाल येणे बाकी होते, नुकताच भोपाळच्या प्रयोग शाळेकडून हा अहवाल प्राप्त झाला असून, कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याचे निदान झालं आहे. परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे.

देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातलेलं असतानाच परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एकाच दिवशी ८०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली होती. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली, तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या असून, त्यापैकी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.

कोंबड्या मरण पावल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्याचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे, तसेच एक किलोमीटर अंतरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. याशिवाय गावातील लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, ‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने रविवारी दिली आहे.

कावळ्यांच्या मृत्युच्या अहवालाची प्रतीक्षा
बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले. तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यातील तीन हजार ३२१ कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे. मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे रविवारी मृतावस्थेत आढळले. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी  मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवाल आल्यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

Kisanwani: